चर्चगेट स्टेशनवर ‘लायब्ररी जंक्शन’चे उद्घाटन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी वाचनाची आवड जोपासण्याच्या उद्देशाने चर्चगेट रेल्वे स्थानकात ‘लायब्ररी जंक्शन’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2026 रोजी या मोफत सार्वजनिक स्टेशन लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले.

हा उपक्रम प्रोजेक्ट मुंबईने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या सहकार्याने आणि एल अँड टी लिमिटेडच्या सामाजिक उपक्रम भागीदारीत राबवला आहे. उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट कर्णधार एबी द व्हिलियर्स यांच्या हस्ते झाले.

यावेळी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक Pankaj Singh आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते.

‘लायब्ररी जंक्शन’ हा प्रोजेक्ट मुंबईच्या ‘रीड मुंबई’ मोहिमेचा भाग असून सर्व स्तरातील नागरिकांसाठी वाचन आणि ज्ञानाची दालने उपलब्ध करून देण्याचा त्यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे हे वाचनालय प्रोजेक्ट मुंबईच्या ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ मोहिमेत संकलित करण्यात आलेल्या पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार करण्यात आले आहे.

सध्या या वाचनालयात सुमारे 1,200 पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे. यामध्ये कॉमिक्स, बालकथा, कादंबऱ्या, स्वयंविकासावरील पुस्तके, आत्मचरित्रे, योग विषयक पुस्तके तसेच ‘नॅशनल जिओग्राफिक’सारखी नियतकालिके समाविष्ट आहेत.

सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथपाल उपलब्ध असणार असून प्रवासी पुस्तके घेऊन जाऊन दोन आठवड्यांच्या आत परत करू शकतील.

शाळा आणि विविध समुदायांकडून पुस्तकदानाच्या माध्यमातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांना पुढेही पुस्तकांचे दान करून या वाचनालयात योगदान देता येणार आहे. भविष्यात शहरातील इतर भागांमध्येही अशाच वाचनालयांची उभारणी करण्याचा प्रोजेक्ट मुंबईचा मानस आहे.

पश्चिम रेल्वेने या उपक्रमाचे स्वागत करत प्रवाशांचा प्रवास अधिक अर्थपूर्ण आणि ज्ञानवर्धक करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.


हेही वाचा

धारावीतील पहिला टप्प्यातील घरे 2028 पर्यंत मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या