Coronavirus Updates: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीला परवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. ही वाढ लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा लॉकडाऊनचा दसरा टप्पा मानला तरी हरकत नाही. या दुसऱ्या टप्प्यात मिठाईची दुकाने, नाश्त्याचे पदार्थ आणि फरसाणची विक्री करणाऱ्या दुकानांनाही सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रात पूर्वीप्रमाणेच शेतीशी संबंधित सर्व बाबी आणि इतर सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला दिलेली परवानगी कायम राहणार आहे.                        

या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीलाही सरकारनं परवानगी दिली असून, मासे वाहतूक करण्यासही हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत आणि नंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ३ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात ज्या बाबींना सूट देण्यात आली होती, त्याविषयी ३१ मार्च रोजी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, आता त्यात नव्याने काही बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

शेतीशी आणि वनांशी संबंधित काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यात शेती उत्पादनांची खरेदी करणाऱ्या संस्था, विशेषतः कापूस आणि तूर डाळ यांची खरेदी करणाऱ्या संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या मंडया, शेतकऱ्यांकडून आणि शेतमजुरांकडून करण्यात येणाऱ्या शेतीच्या कामांचा समावेश आहे. 

मत्स्य उद्योगाबाबत घेतलेले निर्णय

  • मासेमारीस मान्यता देण्यात आली.
  • मत्स्य उद्योगासाठी लागणारे खाद्य, शीत साखळी, विक्री व पणन, मत्स्यपालन, व्यावसायिक मत्स्यकेंद्रं, खाद्य केंद्रास परवानगी असणार आहे.
  • मासे तसंच कोळंबी वाहतूकही खुली होणार आहे.
  • अन्न उत्पादनं, मत्स्य बीज आणि खाद्यासाठी काम करणारे कामगार, जंगलात वणवे टाळण्यासाठी पडलेली लाकडं वेचणं, तात्पुरत्या विक्रीसाठीचे डेपो यांचाही यात समावेश असणार आहे.
  • शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे, अवजारांचे सुटे भागाची दुकाने सुरू राहणार आहेत.
  • गव्हाचे पीठ, डाळी, खाद्यतेल उत्पादन सुरू असणार आहे.

अशी आहे सुविधा

  • आवश्यक आणि गरज असलेल्या साहित्य व वस्तूंच्या वाहतुकीसाठी या सीमा खुल्या राहणार आहेत. 
  • जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंसाठी आंतरराज्यीय तसेच दोन राज्यांमधील ट्रक वाहतूक, मालवाहतूक सुरू राहणार आहे. 
  • वाहनचालकांच्या व्यतिरिक्त फक्त एका व्यक्तीला विहित कागदपत्रानुसार परवानगी असणार आहे. 
  • रिकामे तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना माल आणण्यासाठी किंवा पोहोचविण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. 
  • राज्याच्या सर्व सीमा प्रवासी वाहतुकीसाठी बंदच राहतील. 

शीतगृहे, वखार सेवा, ठोक विक्री आणि वितरण व्यवस्था, पुरवठा साखळी आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि मालाची वाहतूक, अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांसह सर्व प्रकारचा माल आणि वस्तू यांचे ई-कॉमर्सद्वारे वितरण, सेबीद्वारे अधिसूचित केलेल्या एनबीएफसी आणि भांडवली बाजारातील सेवा यांनाही परवानगी आहे.

ट्रक दुरुस्तीची विशेषत: पेट्रोल पंपाजवळची दुकानं सुरू राहणार आहेत. वीज वितरण आणि पारेषण करणाऱ्या जनित्र दुरुस्तीची दुकानं, शेती आणि फुलशेती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक, पॅकेजिंग, कोळसा आणि खाण उत्पादने, वाहतूक, खाणीउद्योगांना स्फोटकांचा पुरवठा तसेच खाणी उद्योगाशी इतर बाबींना परवानगी असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या