मुंबई विमानतळावरील वाहतूक 'हवेतच', मुख्य धावपट्टी अजूनही बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मंगळवारपासूनच सुरू असलेला मुसळधार पाऊस बुधवारीही कायम राहिल्याने या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीप्रमाणेच हवाई वाहतुकीलाही बसला. स्पाईस जेटचे वाराणसी - मुंबई विमान धावपट्टीवरून घसरून चिखलात जाऊन रूतल्याने मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. तुफान पाऊस त्यातच विमानाला झालेल्या अपघाताचा फटका आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासासाठी निघालेल्या शेकडो विमान प्रवाशांनाही बसला. आतापर्यंत ५० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

विमानतळावरील मुख्य धावपट्टी अजून काही काळासाठी बंद राहणार असल्याने सर्वच विमान कंपन्यांचे वेळापत्रक अक्षरश: कोडमडले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना कुठले विमान रद्द केले किंवा कुठले विमान वळवण्यात आले, याची माहिती व्यवस्थित पुरवण्यात येत नसल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत. काही प्रवासी तर १२ तासांहून विमानतळावरच ताटकळले आहेत. प्रत्येक प्रवाशाने आपापल्या विमान कंपन्यांच्या काऊंटवर गर्दी केल्याने सर्वत्रच गोंधळ उडाला. प्रवाशांना नेमके काय उत्तर द्यायचे याबाबत कर्मचारीही बुचकळ्यात पडलेत. 

मुंबई विमानतळावरील मंगळवारची स्थिती 

ज्या विमान प्रवाशांची मंगळवारी विमाने रद्द झाली किंवा इतरत्र वळवण्यात आली, अशा विमान प्रवाशांची आम्ही योग्य रितीने काळजी घेतली. त्यांना मोफत तसेच कमी दरांत अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात अाला. परंतु बुधवारी सर्वकाही सुरळीत असल्याने प्रवाशांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागले नाही.

- वीणा चिपळूणकर, हेड, काॅर्पोरेट कम्युनिकेशन, जीव्हीके 

मंगळवारपासून बुधवारी पहाटेपर्यंत अंदाजे ६ आंतरराष्ट्रीय विमानांना दिल्ली विमानतळावर वळवण्यात आले होते, तर ५६ विमानेही अन्य विमानतळांवर वळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या मुख्य धावपट्टी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण प्रयत्न करत असून विमान उड्डाणासाठी पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येत आहे.

सध्या विमान उड्डाणांची सेवा सुरू आहे. पण पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने विमान उड्डाणे 15 ते 20 मिनिटे उशिरा सुरू आहेत. मुख्य धावपट्टी अजूनही बंद आहे. काही वेळानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येईल. स्पाईस जेट विमान कशामुळे घसरले याचा तपास अजून सुरू आहे.

- वर्षा रामचंद्रन, अधिकारी, मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशन लि.

दरम्यान एअर इंडिया, व्हिस्तारा, इंडिगो, स्पाईसजेट इ. विमान कंपन्या प्रवाशांना तिकीटांचे पूर्ण पैसे परत करत आहेत. तिकीट रद्द करण्यासाठी लावण्यात येणारा दंड  कुठल्याही प्रवाशांकडून वसूल न करण्याचे धोरण विमान कंपन्यांनी अवलंबले आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या