वांद्रे समुद्रातलं फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडालं

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • सिविक

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग रेस्टॉरंट समुद्रात बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या फ्लोटिंग रेस्टॉरंटवरील १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली. वांद्रे-वरळी सी लिंक समुद्रात या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आलं होतं. ही खासगी बोट असून ए. आर. के. कंपनीची होती. या फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये १५ कामगार कामाला होते.

'इथं' बघा बुडालेलं फ्लोटिंग रेस्टाॅरंट

नक्की घडलं काय?

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही क्रूज किनाऱ्यावर उभी असताना भरतीमुळे या बोटीचा अँकर निसटला आणि ही बोट समुद्रात आतपर्यंत वहात गेली. दरम्यान, बोटीच्या खाली दगड आला. यामुळे बोटीच्या खालच्या भागाचं नुकसान झालं आणि समुद्राचं पाणी आत शिरलं. यामुळे ही बोट कलंडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

१५ कामगारांची सुखरूप सुटका

वेळीच क्रूजवर अडकलेल्यांच्या मदतीसाठी पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांनी धाव घेतली. क्रूजवरील १५ जणांना सुखरूप बाहेर काढलं. सध्या पाण्यात अधांतरी तरंगत असलेल्या या क्रूजला बोटींनी समुद्राच्या किनारी आणण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ विक्रम कुमार म्हणाले, ''या फ्लोटिंग हाॅटेलचा परवाना शुक्रवारपर्यंतच होता. त्यानंतर मान्सूनच्या काळात हे हाॅटेल भाऊचा धक्का इथं हलवण्यात येणार होतं. मात्र अनपेक्षित हवामानबदलामुळे हे फ्लोटिंग हाॅटेल पाण्यात वहावत गेलं आणि दगडाला आदळून या बोटीत पाणी शिरलं.''

एआरके डेक बारच्या प्रशासनाने शेवटच्या दिवशी काय म्हटलं?

 

एप्रिलमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

एप्रिल महिन्यात याच बोटीवरील एका कर्मचाऱ्याचे आत्महत्या केली होती. ७ एप्रिलला २३ वर्षीय विनय सिंग राणा नावाच्या एका कर्मचाऱ्याने बोटीवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. विनयने बोटीवरून उडी मारल्याचं कुणालाही समजलं नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हा प्रकार उघड झाला. २४ तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला.

पुढील बातमी
इतर बातम्या