आरे केंद्रावर आता खाद्यपदार्थांची विक्री करता येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आरे केंद्रावर आता खाद्यपदार्थांची विक्री करता येणार आहे. रॉयल्टी तत्त्वावर खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाला दिले. त्याशिवाय, दूधविक्रीतून मिळणाऱ्या अत्यल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर आरे दूध वितरण केंद्रधारकांना दुधासोबतच अन्य खाद्यपदार्थ विक्रीची मुभा मिळणार आहे.

शासकीय दुधाच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी वितरण केंद्राना भेट देऊन तपासणीची कार्यवाही करावी, अशा सूचनाही पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाला दिल्या. याबाबत वरळी आणि आरे डेअरी येथील दूधवितरकांच्या विविध मागण्यांसंदर्भात भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

'या' आहेत मागण्या

  • खाद्यपदार्थ विक्रीला मान्यता द्यावी व वितरकांनी या बदल्यात शासनाला रॉयल्टी द्यावी. 
  • केंद्र चालकांच्या करारामध्ये वेळोवेळी सुधारणा करून त्यांना दूधविक्रीचा लाभ द्यावा. 
  • दूध वाहतुकीकरिता वितरणासाठी खुली निविदा काढावी. 
  • मयत दूध वितरण केंद्रधारकांच्या रक्ताच्या नात्यातील वारसांना केंद्र हस्तांतरित करावी.

या बैठकीत दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, उपायुक्त श्रीकांत शिरपूरकर, दुग्धविकास अवर सचिव राजेश गोविल, दुग्ध महाव्यवस्थापक डी.डी. कुलकर्णी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, तसेच दूधवितरक केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या