गणेशोत्सवासाठी नवी मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका ज्या मार्गांवरून जाणार आहेत, त्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आलं आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानंतर NMMCच्या अभियांत्रिकी विभागाने शहरभर विशेष रस्ता सुधारणा मोहीम सुरू केली आहे.

शहर अभियंता शिरीष आरडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या पथकांकडून विविध भागांतील रस्त्यांची पाहणी केली जात आहे.

या पाहणीमध्ये रस्त्यांवरील खड्डे, खराब झालेला डांबरी पृष्ठभाग, उंच-सखल रस्ते, तसेच ड्रेनेज आणि मॅनहोलच्या झाकणांची स्थिती तपासली जात आहे.

पावसात खड्डे बुजवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान

सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्डे जिओ-टॅग करून मॅस्टिक जिओपॉलिमर किंवा कोल्ड मिक्सच्या मदतीने बुजवले जात आहेत.

पावसात काही काळ खंड मिळाल्यानंतर रस्त्यांवर नियमित डांबरीकरण आणि रिसर्फेसिंग करण्यात येणार आहे.

विशेषतः मोठ्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका आणि विसर्जन मार्गांवर अधिक लक्ष दिलं जात आहे. मोठ्या मूर्तींच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि गणेशभक्तांना त्रास होऊ नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांची विशेष पाहणी केली जात आहे.

विसर्जन घाटांवरही सुविधा

केवळ रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यापुरतंच महापालिकेचं काम मर्यादित राहणार नाही. स्वच्छता, स्ट्रीट लाईट आणि विसर्जन स्थळांवरील आवश्यक सुविधांवरही लक्ष दिलं जात आहे.

दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान रस्त्यांवर अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन NMMCने नागरिकांना केलं आहे.

तसंच पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.


हेही वाचा

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल बंद

पुढील बातमी
इतर बातम्या