रखडलेल्या गझधरबंद पंपिंग स्टेशनचं काम करणार दुसरा कंत्राटदार

खार येथील रखडलेल्या गजधरबंद उदंचन केंद्राचं (पंपिंग स्टेशन) अर्धवट काम आता नवीन कंत्राटदार पूर्ण करणार आहे. यापूर्वीचे कंत्राटदार प्रतिभा इंडस्ट्रीजवर यांनी काम अर्धवट सोडून दिल्यामुळे या कंपनीला कंत्राट कामाच्या २० टक्के दंडाची रक्कम आकारली. मात्र, दुसरीकडे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड बंदर पंपिंग स्टेशनचं काम वेळेत पूर्ण न केलेल्या युनिटी कंस्ट्रक्शन कंपनीला केवळ ५ टक्के दंड आकारला गेला. त्यामुळे महापालिकेचं कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाल्याचा आरोप भाजपानं केला आहे.

नवीन कंत्राटदाराची नेमणूक

खार येथील गजधरबंद पंपिंग स्टेशनचं काम रखडल्याने शिल्लक कामे, कार्यादेश जारी होण्याच्या वेळेस जसे आहे, जेथे आहे, या तत्वावर यांत्रिकी, विद्युत, यंत्रचलीत कामे यांचा पुरवठा, उभारणी तसंच इतर काम आणि पुढील देखभाल आदींकरता नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हे पुढील काम करण्यासाठी मेसर्स मिशीगन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स म्हाळसा कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला ११२.०५ कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे.

दंडाची रक्कम वेगवेगळी का?

हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी हे काम अर्धवट आहे. त्यामुळे अभ्यास न करताच ही निविदा काढली असून पुढची निविदा काढून मिशिगन या कंपनीला संधी दिली. याठिकाणी यापूर्वी काम करणाऱ्या आणि काम अर्धवट सोडणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीजवर कंपनीला २० टक्के एवढा दंड आकारला आहे. हे काम ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पातील असून यापूर्वी ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पातील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्ह लँड बंदर येथील पंपिंग स्टेशनच्या कामाप्रकरणी युनिटी कंस्ट्रक्शन कंपनीला ५ टक्के एवढा दंड आकारला होता. मग एकाच प्रकल्पातील कामांसाठी दंडाची रक्कम वेगवेगळी का असा सवाल करत युनिटीकडून कमी दंड वसूल केल्यामुळे महापालिकेचे सुमारे २५ कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप सामंत यांनी केला. मात्र, याची उत्तरे दिली जावी,असं सांगत हा प्रस्ताव मंजूर केला.

अटी व शर्तीनुसारच काम

युनिटी कंस्ट्रक्शनकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी मात्र आम्हाला झालेला दंड निविदेतील अटी आणि शर्तीनुसार होता. आमच्याकडून प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे होता. ती दंडाची रक्कम आमच्याकडून प्रशासनाने वसूलही केली. परंतु, आम्ही कुठेही प्रकल्प अर्धवट सोडला नव्हता. थोडा फार विलंब झाला असला तरी आम्ही लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंद हे प्रकल्प पूर्ण केलं असून त्याचे मागील आठ वर्षांपासून देखभालही करत आहोत. याशिवाय ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचंही तीन वर्षांपासून देखभाल करत असल्याची माहिती कंपनीचे संचालक निलेश जामदार यांनी दिली. आम्ही महापालिकेच्या अटी व शर्तीनुसारच काम करत असून दुसऱ्या कंपनीला जास्त दंड का याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या