हुतात्मा गिरणी कामगारांचा सरकारला विसर

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आज राज्यभर 'महाराष्ट्र दिन' मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र ज्या हुतात्म्यांमुळे आज हा दिवस आपण साजरा करत आहोत, त्या हुतात्म्यांचा राज्य सरकारला साफ विसर पडल्याचे चित्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 22 हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांना गिरणी कामगारांच्या सोडतीत राखीव ठेवण्यात आलेली 20 घरे धूळ खात पडून आहेत. 

याचे कारण म्हणजे हुतात्म्यांचे वारस सरकारला सापडत नसल्याने सरकारने, गृहनिर्माण विभागाने वारसांची शोध मोहीम गेल्या दोन वर्षांपासून बंद केली आहे. त्यामुळे आता यापुढे वारस सापडतील आणि ही घरे वारसांना मिळतील ही आशाही थंडावली आहे. सरकारला वारस सापडत नाहीत ही शोकांतिका आहेच. पण त्यापेक्षा मोठी शोकांतिका म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची केवळ नावे वगळता त्यांची वा त्यांच्या वारसांची कोणतीही माहिती सरकार दरबारी नाही आणि याचमुळे हुतात्मा कामगारांच्या वारसांचा शोध ठप्प झाला आहे.

गिरणी कामगारांसाठी 2012 मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील घोडपदेव, न्यू हिंद मिलमधील 22 घरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने हुतात्मा कामगारांची नावे शोधून काढत वारसांचा शोध सुरू केला. वर्तमानपत्रातून नावांची यादी प्रसिद्ध करत वारसांना आवाहन केले. त्यानुसार केवळ दोन वारसांचाच शोध लागला आणि त्यांना घरेही वितरीत करण्यात आली. 

उर्वरित 20 वारसांचा गेल्या वर्षात काही शोध लागलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालये, पोलीस ठाणी शोधून झाली तरी वारसांचा शोध लागत नसल्याचे म्हणत दोन वर्षांपूर्वी गृहनिर्माण विभागाने ही शोध मोहीम थांबवली ती थांबवलीच. त्यामुळेच आजही न्यू हिंद मिलमधील घरे धूळ खात पडून आहेत. त्याची देखभाल म्हाडाला करावी लागत असून, या घरांमध्ये घुसखोरी होण्याचीही भिती आहे. त्यामुळे या घरांसंबंधी त्वरीत काही तरी निर्णय घ्यावा, अशी मागणी म्हाडाकडूनही केली जात आहे.

गृहनिर्माण विभागाचा अजब कारभार
वारसांचा शोध घेण्याची आणि पात्रता निश्चित करण्याची पूर्ण जबाबदारी गृहनिर्माण विभागावर सरकारने टाकली आहे. वारसांची पात्रता निश्चित झाल्यानंतर केवळ घराचं वितरण करत मुद्रांक शुल्क भरण्याची जबादारी म्हाडावर आहे. असे असताना गृहनिर्माण विभागाला मात्र या जबाबदारीचाच विसर पडला आहे. गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बी. जी. पवार यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला असता त्यांनी हे काम आमचे नाही, हे तर म्हाडाचे काम आहे, त्यामुळे वारसांचे काय झाले हे म्हाडालाच विचारा असे म्हणत सरळ हात वर केले. शोध मोहिमेची जबाबदारी गृहनिर्माण विभागाचीच आहे हे समजावून देण्याची तयारीही यावेळी त्यांची दिसून आली नाही.

हा तर हुतात्म्यांचा अपमान
हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांना घरे देण्याचा निर्णय चांगला होता. पण त्यांचं रेकॉर्ड सरकारकडे नसणे ही केवळ शोकांतिका नाही तर हा हुतात्म्यांचा अपमान आहे आणि त्याहीपेक्षा मोठा अपमान आता राज्य सरकार आणि त्यांचे अधिकारी स्वत:ची जबबाबदारी नाकारत करत आहेत. शोध घेतला तर नक्की वारस सापडतील पण इतके कष्ट करण्याची तयारी अधिकाऱ्यांची नाही. त्यामुळे वारस सापडत नाहीत. त्यामुळे आता एक तर सरकारने वारस शोधावेत नाही तर धूळ खात पडून असलेल्या घरांसबंधी काय तो योग्य निर्णय घ्यावा, हीच आमची मागणी आहे.
हेमंत राऊळ, ज्येष्ठ गिरणी कामगार नेते

राखीव घरे ठेवण्यात आलेल्या हुतात्मा गिरणी कामगारांची नावे पुढील प्रमाणे
1) भिकाजी पांडुरंग रंगाटे- रंगाटे यांच्या पत्नी चंद्रभागा रंगाटे यांना घर वितरीत
2) कृष्णाजी शिंदे-शिंदे यांच्या पत्नी रुक्मिणी शिंदे यांना घर वितरीत
3) वासुदेव सूर्याजी मांजरेकर-वारस बेपत्ता
4) बबन बापू भरगुडे-वारस बेपत्ता
5) विष्णू सखाराम बने-वारस बेपत्ता
6) रामा लखन विंदा-वारस बेपत्ता
7) परशुराम अंबाजी देसाई-वारस बेपत्ता
8) घनश्याम बाबू कोलार-वारस बेपत्ता
9) धोंडो राघो पुजारी-वारस बेपत्ता
10) हृदयसिंग दारजेसिंग-वारस बेपत्ता
11) पांडू माहादू अवरीरकर-वारस बेपत्ता
12) रघुनाथ सखाराम बीनगुडे-वारस बेपत्ता
13) काशिनाथ गोविंदर चिंदरकर-वारस बेपत्ता
14) सुखालाल रामलाल बसकर-वारस बेपत्ता
15) सीताराम दुलाजी घाडीगावकर-वारस बेपत्ता
16) निवृती विठोबा मोरे-वारस बेपत्ता
17) भाऊ सखाराम कदम-वारस बेपत्ता
18) पांडुरंग बाबाजी जाधव-वारस बेपत्ता
19) सीताराम गयादीन-वारस बेपत्ता
20) गोपाळ चिमाजी कोरडे-वारस बेपत्ता
21) सदाशिव भोसले-वारस बेपत्ता
एक नावही बेपत्ता आहे.
या यादीतील हुतात्म्यांच्या वारसांनी गृहनिर्माण विभाग, कामगार संघटना वा म्हाडाकडे संपर्क साधावा, असे आवाहन गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या