फक्त मुंबईतच मिळेल अमेरिकेचं ग्रीन कार्ड!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

अमेरिकेचं 'ग्रीन कार्ड' देण्याची सुविधा आता केवळ मुंबईतील अमेरिकन काउंन्सुलेट जनरल (दूतावास) मधून मिळणार आहे. आतापर्यंत 'ग्रीन कार्ड' अर्थात इमिग्रेशन व्हिसा देण्याची ही सुविधा मुंबईसोबत दिल्ली आणि चेन्नई इथल्या अमेरिकन दूतावासातून दिली जात होती. परंतु आता ही सुविधा केवळ मुंबईतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रीन कार्ड कशासाठी?

अमेरिकेत दीर्घावधी वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड किंवा इमिग्रेशन व्हिसाची आवश्यकता असते. यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय देशाच्या कानाकोपऱ्यातून अर्ज करतात. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयामुळे दिल्ली आणि चेन्नई कार्यालयात इमिग्रेशनसाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे.

बंद करण्याचं कारण काय?

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणानुसार प्रत्येक देशात केवळ एकाच ठिकाणाहून इमिग्रेशन व्हिसा उपलब्ध करून दिला जातो. सोबतच दिल्ली आणि चेन्नई इथल्या कार्यालयाची जागा देखील अपुरी आहे. त्यामुळे यापुढे केवळ मुंबईतूनच ग्रीन कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही सुविधा फक्त मुंबईतूनच देण्यात येईल.

अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार अजूनपर्यंत एच १ बी व्हिसा नियमांत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या