जाॅगिंग ट्रॅक, जीम खुली करण्याचा आग्रह!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी राज्य सरकारने जाॅगिंग ट्रॅक आणि व्यायामाची ठिकाणं सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतीच पत्र लिहून केली आहे. यासंदर्भात जीम एम्प्लॉयर्स ट्रेनर्स अँड ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आहे.  

या भेटीत पदाधिकाऱ्यांनी जीम मालक आणि ट्रेनर्सच्या व्यथा मांडताना एक निवेदन देखील दिलं आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, सरकारने जीम/व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर जीम मालक अत्यंत सावधगिरी बाळगून जीम चालवत होते. सॅनिटायझेशन, मास्क, सुरक्षित अंतर अशा सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. तरीही राज्य सरकारने जीम/व्यायामशाळा बंद करून आम्हाला आर्थिक संकटात टाकलं आहे. 

हेही वाचा- नवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू

जीम मालकांना आर्थिक नुकसान सहन करण्यासोबतच जीममध्ये काम करणारे ट्रेनर्स इतर कर्मचारी यांच्या देखील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीममध्ये सदस्यत्व घेणारे बहुतेकजण सलग ६ महिने किंवा वर्षभरासाठी पैसे भरून नोंदणी करत असल्याने त्यांचंही नुकसान होत आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरात रोगप्रतिकारक शक्तीच्या वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम ही आवश्यक बाब असल्याने सध्याच्या काळात जीम बंद ठेवण्यापेक्षा सुरू ठेवणंच योग्य आहे. जेणेकरून व्यायाम करून आजारांना दूर ठेवता येईल.

गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या काळात देखील सर्वात उशीरा जीम चालकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. यावेळी देखील संचारबंदी लागू करताना राज्यात जाॅगिंग ट्रॅक, पार्क, रिक्रिएशन क्लब, बागा, उद्यान, व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्रात येत्या ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

हेही वाचा- शिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ
पुढील बातमी
इतर बातम्या