मुंबईकरांनो, तुम्ही गटारातली भाजी खाताय का? शंका असेल तर 'हे' वाचा

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने धडक कारवाई सुरू केल्यामुळे फेरीवाले धास्तावून गेले आहेत. म्हणूनच कुठल्याही क्षणी होणाऱ्या महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि पुन्हा त्याच जागी धंदा करण्यासाठी फेरीवाले नामी शक्कल लढवत आहे. पण ही शक्कल आता ग्राहकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. कारण कारवाईदरम्यान भाजीपाला, वस्तू लपवून ठेवण्यासाठी फेरीवाले पावासाचे पाणी वाहून नेण्यासाठी बनवण्यात आलेल्या गटारांचा वापर करत असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे. हा प्रकार सांताक्रूझमधील वाकोला परिसरात घडला असून ही बाब महापालिकेला कळताच त्यांनी हा घातक प्रकार करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.

फेरीवाल्यांची नवी शक्कल 

मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र याबाबत लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जात आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू असली तरी फेरीवाऱ्यांविरोधात सर्व विभागांमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून धडक कारवाई केली जात आहे. ही कारवाई निरंतर सुरू असल्यामुळे फेरीवल्यांनी भाजीपाल्यासकट इतर विक्रीचं सामान चक्क रस्त्यालगतच्या गटारांमध्ये लपवून ठेवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. महापालिकेचे अधिकारी निघून गेल्यावर हे सामान गटारातून बाहेर काढून पुन्हा विक्री केली जात आहे.  

इथंही होतो असा प्रकार?

सध्या येथील रस्त्याचं काम सुरू आहे आणि पदपथाखाली पर्जन्य जलवाहिन्या बनवल्या आहेत. सध्या या पर्जन्य जलवाहिन्या बंद असल्याने फेरीवाऱ्यांकडून सामान ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. अशाच प्रकारे केशवसूत उड्डाणपुलाखालील जलवाहिनीच्या मॅनहोलमध्ये फेरीवाले आपलं सामान लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

व्हिडिओची दखल घेऊन कारवाई

महापालिकेच्या एच/ पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडिओ वाकोला नेहरू रोड, मंथन प्लाझा येथील असल्याचं सांगितलं. या व्हिडिओची दखल घेऊन त्या सर्व फेरीवाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून लपवून ठरलेलं सामानही जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी हा व्हिडीओ पाहून अशाप्रकारे जर रस्त्यालगतच्या नाल्यांचा वापर समान लपवण्यासाठी फेरीवाले करत असतील, तर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे निर्देश विभाग कार्यालयांना दिले जातील, असं सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या