महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे नुकतेच एका आरोग्य शिबिराचे आयोजन वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात तब्बल 400 ते 500 महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. सातत्याने कचऱ्याच्या सानिध्यात राहिल्याने या महिलांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे या महिलांच्या आरोग्याचा विचार करून दिव्यज फाऊंडेशनतर्फे या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य, योगा, मेडिटेशन, त्वचारोग, मधुमेह, परिवार कल्याण आणि नियोजन, यांसारख्या काही महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या महिलांना लाभले.

या कार्यक्रमाचा समारोप अमृता फडणवीस, पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि शेफ संजीव कपूर यांच्या उपस्थितीत झाला. स्त्रियांनी आपल्या सबलीकरणावर आणि सक्षमीकरणावर भर देत आपल्या स्वप्नांच्या पंखांनी उंच भरारी घेण्याचा सल्ला यावेळी अमृता फडणवीस यांनी दिला. समाजातील वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्यासाठी दिव्यज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था सातत्याने झटत आहे. हल्लीच अॅसिड पीडितांचा ढळलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून 'कॉन्फिडेंस वॉक'चे आयोजन देखील करण्यात आले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या