उघड्यावर मटण, चिकन विकणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिकन आणि मटण उघड्यावर ठेवून विक्री करणाऱ्या 35 दुकानांवर कारवाई केली आहे. याचदरम्यान पालिकेच्या फ विभागाने 1 दुकानातील सामान जप्त करत दंड ठोठावला आहे. इतर दुकानदरांना देखील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वसई-विरार महापौरांकडून आरोग्य विभागाला यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांनी उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांनी त्यांच्या क्षेत्रातील उघड्यावर मांसविक्री होणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. पालिका प्रभाग समिती फ चे आरोग्य अधिकारी अविनाश गुंजाळकर यांनी त्यांच्या पथकाबरोबर त्यांच्या विभागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी 35 दुकानांवर कारवाई केली. या विभागाच्या वाकनपाड्यामध्ये 9, श्रीनगरमध्ये 6 आणि गोराई पाड्यात 4 यांसह यूपी नाका, संतोष भुवन, पांड्येनगर आणि आझादनगर येथील 16 दुकानांवर कारवाई करण्यात आली असल्याचे आरोग्य अधिकारी अविनाश गुंजाळकर यांनी सांगितले.

या कारवाईदरम्यान एका दुकानाला दंड ठोठावला, तर अनेक दुकानातले सामान जप्त केले. यासह तिथल्या इतर दुकानदारांना मांसविक्री उघड्यावर केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मांसविक्री अशाप्रकारे उघड्यावर होत असल्याने तिथल्या स्थानिकांना त्रास होतो. मांस उघड्यावर ठेवल्याने त्यावर धुळ आणि माशा बसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, असे गुंजाळकर म्हणाले. जर यापुढे दुकानदारांनी पालिकेने घातलेल्या नियमांचे पालन केले नाही तर, 15 दिवसात दुकान बंद केले जाईल, अशी सूचना वसई-विरार पालिकेलेने दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या