घरात आग लागली तर घरमालक भाडेकरुला भरपाई देणार!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घराला, इमारतीला लागलेली आग यापुढे मालकांना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. मालकाने घरात वा इमारतीत आग प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या नसतील आणि त्यामुळे आग लागली असेल तर मालकाला पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी लागेल. केंद्र सरकारकडून आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी 'अग्निशमन आणि आपात्कालीन सेवा अस्थापना विधेयक 2016' तयार करण्यात येत आहे. त्यातील शिफारशींनुसार आगीची जबाबदारी निश्चित करत त्यासाठी मालकाला जबाबदार ठरवत मालकाकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे.

या शिफारशीनुसार अग्निशमन दलातील एका अग्निशमन अधिकाऱ्याची नोडेल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास या ऑफिसरकडून आगीची चौकशी करण्यात येईल. निष्काळजीपणामुळे वा दुर्लक्षामुळे आग लागल्याचे यात निष्पन्न झाल्यास मालकाला जबाबदार ठरवण्यात येणार आहे. तर या प्रकरणी सुनावणी घेत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करत त्यासंबंधीचे आदेश दिल्यानंतर मालकाला ही रक्कम भरावी लागणार आहे. मात्र मालकाला जबाबदार धरणे चुकीचे ठरेल. भाड्याने घर, इमारत दिली असेल तरी त्यातील आगीसाठी ही मालक कसा जबाबदार? त्यामुळे यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

-  अॅड. विनोद संपत, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ

मात्र अजूनही ही शिफारस आहे, यासंबंधीचे नियम अजून व्हायचे आहेत. त्यामुळे आताच काही बोलणे योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.

फायर टॅक्स ही भरावा लागणार

घराच्या खरेदी विक्रीवर मालमत्ता करासह अनेक कर भरावे लागतात. त्यात यापुढे आणखी एका फायर टॅक्सचीही भर पडण्याची शक्यता आहे. मालमत्ता करामध्येच हा कर वसूल करण्याची शिफारस या बिलात करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या