'इथे' तर गाड्यांची पार्किंग, अभ्यास करायचा कुठे?

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहा बाय दहाच्या खोलीतील गडबड गोंधळात अभ्यास करणं शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी वरळीतील 'अभ्यास गल्ली'चा आसरा घेतात. या गल्लीत अभ्यास करून असंख्य विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत. सध्या सहामाही परीक्षांचा मोसम असल्याने या अभ्यास गल्लीत विद्यार्थ्यांची गर्दी होत असेल, असा तुमचा अंदाज असेल, तर तो चुकीचा आहे. कारण अभ्यास गल्लीला सध्या अवैध पार्किंगचा विळखा बसल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

म्हणून 'अभ्यास गल्ली' असं नाव

वरळीच्या अ‍ॅनी बेझंट रोडला लागून असलेली पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या मागची एक छोटीशी गल्ली. ही गल्ली पुढे दूरदर्शन केंद्राजवळील पांडुरंग बुधकर मार्गाला मिळते. याच गल्लीला म्हणतात अभ्यास गल्ली. गिरणगावात मोडणाऱ्या वरळीतील १२१ बीडीडी चाळीत चाळींमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाचं प्रमाण मोठं आहे. १२० चौ. फुटांच्या या लहानशा घरांमध्ये २ ते ४ कुटुंब राहात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला जागाच मिळायची नाही. तेव्हा ३० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी या गल्लीत येऊन अभ्यास करायला सुरूवात केली. तेव्हापासून या गल्लीला 'अभ्यास गल्ली' असं नाव पडलं.

२०१४ साली नावाला मंजुरी

महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून वरळी विधानसभेचे युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांनी 2014 साली त्या गल्लीला अभ्यास गल्ली असे नाव मंजूर करून आणले आहे. या अभ्यास गल्लीच्या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता.

विद्यार्थी करतायत 'ही' मागणी

सध्या या गल्लीत बेकायदेशीरपणे वाहनं उभी केली जात आहेत. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना वाहनांचे आवाज सहन करावे लागत आहेत. स्थानिक खासदाराच्या फंडातून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली असली, तरी या बाकांवर हल्ली प्रेमी युगुल बसलेली असतात. या सर्व प्रकाराकडे स्थानिक पोलिसांचं संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. आरटीओने या अवैध पार्किंगला आळा घालावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

वाचनालयात अभ्यास करताना वेळेची मर्यादा असते. पण येथे विद्यार्थ्यांना हवा तितका वेळ अभ्यास करता येतो. २०१४ मध्ये मी स्वतः पाठपुरावा करून या गल्लीला अभ्यास गल्ली नाव मिळावं म्हणून प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना बाकांवर बसून अभ्यास करता यावा यासाठी खासदार फंडातून बाकं लावण्यात अालेली आहेत. पण अवैध पार्किंगमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही लवकरच स्थानिक पोलीस स्टेशन, आरटीओ आणि महापालिका जी दक्षिण विभाग यांच्याकडे या संदर्भात तक्रार नोंदवणार आहोत.

- अभिजीत पाटील, युवासेना उपविभागीय अधिकारी, वरळी विधानसभा

पुढील बातमी
इतर बातम्या