येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यात उकाडा प्रचंड वाढला असून, त्यामुळं नागरिकांना उकाड्याच्या त्रासाला समोरं जावं लागत आहे. मात्र, नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात अनेक ठिकाणी येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास मंगळवारी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनाही अनुभवाला आल्या. मुंबईमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये मंगळवारी सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३४.५ अंशांपर्यंत पोहोचलं आहे. सांताक्रुझ इथं सलग २ दिवस पारा चढा आहे. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशांना अधिक आहे. तर कुलाबा इथंही ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळं घाम येण्यानं अस्वस्थतेतही भर पडली आहे. राज्यात इतरत्रही तापमानाचा पारा मंगळवारी चढाच होता. वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. वातावरणात वाढलेली उष्णता, तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली चक्रीय वात स्थिती यामुळे होत असलेला आर्द्रतेचा पुरवठा यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड, रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्गात याचा प्रभाव शुक्रवारी कमी होईल. पालघरमध्ये शुक्रवारी तर ठाण्यात बुधवार ते शनिवार या काळात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार या परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी तर जळगावमध्ये शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक, अहमदनदगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद इथं आठवड्याच्या अखेरपर्यंत मेघगर्जनेसह वीजा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरातही पुढील दोन दिवस पाऊस असेल त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल अशी शक्यता आहे.

विदर्भात या काळात फारसा पाऊस नाही. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचे हवामान दुपारनंतर संध्याकाळी आणि रात्री असण्याची शक्यता अधिक असते. वीजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

पुढील बातमी
इतर बातम्या