मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भायखळातील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या १० दिवसांत ६ मुलांसह ३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने शनिवारी भायखळा महिला कारागृहात ३९ कैद्यांना करोनाची लागण झाल्यानंतर सील केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी स्थानिक आरोग्य विभागाला कारागृहात अनेक रुग्णांना ताप येत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरला पहिल्यांदा तपासणी शिबीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कैद्यांची तसंच, सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या १२० हून अधिक कोविड -१९ चाचण्या घेण्यात आल्या. ज्यामधून एकूण ३९ कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

माझगाव परिसरातील पाटणवाला नगरपालिकेच्या शाळेत कैद्यांना सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या कैद्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश असल्यानं तिला खबरदारीचा उपाय म्हणून जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारागृहात परतलेल्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्यानं अन्य कैद्यांना लागण झाली असाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान हा परिसर सील करण्यात आला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ४५४ करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,१७,५२१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत गेल्या २४ तासांत पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ४६७६ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ११९५ दिवसांवर गेला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या