मुंबईचं कमाल तापमान एका महिन्यात २ वेळा ३८ अंशावर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबईच्या कमाल तापमानात मागील अनेक दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. अशातच मुंबईकरांना गुरुवारी उष्णतेच्या लाटेची तीव्र जाणीव झाली. मुंबईतील सांताक्रूझ येथे तापमानाचा पारा ३८.४ अंश सेल्सिअसपर्यंत चढला होता. तसच, कोकण विभागामध्ये तापमानात गुरुवारी मोठी वाढ नोंदवली गेली. कमी आर्द्रतेमुळे उन्हाचा चटका अधिक जाणवल्याच समजतं.

मुंबईचं तापमान एका महिन्यात २ वेळा ३८ अंशांच्यावर नोंदवलं गेलं आहे. गुरुवारचं तापमान हे गेल्या १० वर्षांतील फेब्रुवारीतील तिसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान आहे.

मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तीव्र तापमानाचा अनुभव येतो. यंदा १७ फेब्रुवारी रोजी ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते. 

मंगळवार आणि बुधवारी मुंबईत तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक होते. मात्र गुरुवारी कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ झाली. गुरुवारचे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ६.३ अंशांनी अधिक होते. मात्र आर्द्रता ३६ टक्के असल्याने उन्हाच्या झळांची अधिक जाणीव होत होती. 

आर्द्रता कमी असल्याने घामापासून सुटका झाली, मात्र चटके जाणवले. कुलाबा येथेही सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी तापमान अधिक नोंदवले गेले. कुलाबा येथे कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते.

पूर्वेकडून वाहणारे वारे, कमी आर्द्रता आणि समुद्रावरून वारे उशिरा येत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे तापमान शुक्रवारपासून हळुहळू उतरायला सुरुवात होईल. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची आशा आहे. तापमानवाढीतील फरक उपनगरांमध्ये अधिक जाणवला. गुरुवारी बोरिवली येथे मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले. बोरिवली येथे कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस होते.

मुंबईत या आधी २०१२मध्ये फेब्रुवारीतील तापमानाने ३९.१ अंशांचा पारा गाठला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१७मध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी केवळ मुंबईच नाही तर रत्नागिरी येथेही ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

पुढील बातमी
इतर बातम्या