‘विक्रांत’च्या अपयशानंतर ‘विराट’ वाचवण्याची शिवसेनेची मागणी

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - भारतीय नौदलातील ‘आयएनएस विक्रांत’ ही ऐतिहासिक युद्धनौका वाचवून या ठिकाणी वस्तूसंग्रहालय तयार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महापालिकेने यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली होती. परंतु ही युद्धनौका वाचवण्यात महापालिकेला यश आले नाही. ही नौका अखेर लिलावात जावून त्याची तोडमोड झाली. त्यामुळे ‘विक्रांत’ युद्धनौका वाचवण्यात आलेल्या अपयशानंतर आता महापालिका ‘विराट’ युद्धनौका वाचवण्याचा प्रयत्न कर असून या युद्धनौकेच्या जागी तरंगते वस्तुसंग्रहालय बनवण्याची मागणी महापालिकेकडून पुन्हा होत आहे.

भारतीय नौदलातील ‘विक्रांत’ युद्धनौकेनंतर ६ मार्चला ५७ वर्षांच्या देशसेवेनंतर भारतीय नौदलातील ‘आयएनएस विराट’ ही ऐतिहासिक युद्धनौका निवृत्त झाली. त्यामुळे आता या युद्धनौकेमध्ये तरंगते वस्तुसंग्रहालय करण्याकरता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन तशी मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेपुढे हे पत्र जाधव यांनी मंजुरीला ठेवले आहे. आयएनएस ‘विराट’ या ऐतिहासिक युद्धनौकेमध्ये तरंगते वस्तूसंग्रहालय करण्याकरता देशातील किनारी राज्यांनी एकत्र येवून प्रयत्न करावेत, असे आवाहन भारतीय नौदलाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेनेही पुढाकार घ्यावा, याकरता आपण मागणी केली असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितले.

‘आयएनएस विक्रांत’ वाचवून त्याठिकाणी वस्तूसंग्रहालय बनवण्याची मागणी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यासाठी महापलिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भरीव तरतूद केली होती. परंतु तरतूद करूनही या निधीचा वापर होऊ शकला नाही आणि अखेर ही युद्धनौका भंगारात जावून लिलावात विकली गेली. त्यामुळे विक्रांतसाठी निधीची तरतूद करूनही ही युद्धनौका वाचली नाही आणि निधीची तरतूद केली तरी ‘विराट’ युद्धनौका तरी वाचेल का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या