24 तासांत गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची पाहणी करण्याचे आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेश स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली.

शेलार यांनी चंदनवाडी स्मशानभूमीत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवासे आणि दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा हेही उपस्थित होते.

दुर्घटनेचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार

माध्यमांशी बोलताना आशीष शेलार यांनी दुर्घटनेला नेमकी कोणाची चूक जबाबदार आहे आणि अपघाताचं मूळ कारण काय, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असं सांगितलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांना त्यांचं काम करू द्यावं, असंही त्यांनी म्हटलं.

गणेशमूर्ती नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉली, चाकांची रचना, लोखंडी भाग आणि वाहतुकीदरम्यान निर्माण होणाऱ्या कंपनांबाबत गणेश मंडळांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

तसंच, पोलिसांनी जारी केलेल्या सुरक्षा सूचनांचं सर्व गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

24 तासांत गणेशमूर्ती आगमन मार्गांची पाहणी

दुर्घटनेनंतर BMCला मुंबईतील गणेशमूर्ती आगमनासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेलार यांनी सांगितलं की, BMC आयुक्तांशी चर्चा करून पुढील 24 तासांत या मार्गांवरील रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वीही BMCकडून अनेक बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या दुर्घटनेनंतर सर्व संबंधित यंत्रणांना पुन्हा आवश्यक निर्देश देण्यात आल्याचं शेलार यांनी सांगितलं.

प्रशासकीय हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, जखमींना 1 लाख

या दुर्घटनेत दोन गणेश स्वयंसेवकांचा मृत्यू झाल्याचं सांगत शेलार यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जखमी स्वयंसेवकांच्या लवकर बरे होण्यासाठीही त्यांनी प्रार्थना केली.

मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत, तर जखमींना 1 लाखांची वैयक्तिक आर्थिक मदत देण्याची घोषणा आशीष शेलार यांनी केली.

तसंच, जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आवश्यक ती मदत आणि आर्थिक सहकार्य दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळं, BMC, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


हेही वाचा

मुलुंडमध्ये मोकळ्या जागेवरून राजकीय संघर्ष

पुढील बातमी
इतर बातम्या