मुंबईत अाला बेबी मोशे!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वाचलेला बेबी मोशे होल्त्जबर्ग तब्बल ९ वर्षांनंतर मुंबईत दाखल झाला. मंगळवारी सकाळी तो आजोबांसोबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी दोघांचं स्वागत केलं.

दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईहून थेट इस्त्रायलला गेलेला मोशे त्यावेळी अवघा २ वर्षांचा होता. परंतु आता मोशे ११ वर्षांचा झाला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत मोशे नरिमन हाऊसला भेट देणार आहे.

मुंबई विमानतळावर उतरल्यावर मोशेचे आजोबा रब्बी होल्त्जबर्ग म्हणाले, मुंबईत येऊन आम्हाला आनंद होत आहे. मुंबई पूर्वीच्या तुलनेत आता अधिक सुरक्षित झाली आहे.

मोशे नरिमन हाऊसला भेट देण्यासोबतच गेट वे आॅफ इंडिया आणि ताज हाॅटेल देखील पाहायला जाणार आहे.

नरिमन हाऊसचं स्मारक

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात छाबड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या नरिमन हाऊसला टार्गेट करण्यात आलं होतं. या हल्ल्यात मोशेचे आई-वडील रब्बी गेव्रिएल आणि रिविका होल्त्जबर्ग यांच्यासोबत अन्य ६ जणांचा मृत्यू झाला होता. मोशेचा सांभाळ करणारी सँड्रा मोशेला घेऊन बाहेर पळाल्याने ते दोघेजण या हल्ल्यातून वाचले होते.

त्यानंतर आई-वडील गमावलेल्या मोशेला त्याच्या आजोबांकडे इस्त्रायलला पाठवण्यात आलं. या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ नरिमन हाऊसचं रुपांतर आता स्मारकात करण्यात येणार आहे. नेतन्याहू यांच्या उपस्थितीत स्मारकाची औपचारीक घोषणा करण्यात येईल.


हेही वाचा-

२६/११ हल्ल्याच्या ९ वर्षांनंतर भारतात येणार मोशे


पुढील बातमी
इतर बातम्या