होळीसाठी झाडे तोडाल, तर जेलमध्ये खडी फोडाल!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

होळी सणावेळी रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीमध्ये जाळण्यासाठी तोडली जातात. याला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने परिपत्रक जारी केले आहे. कुणी व्यक्ती अशा प्रकारे झाडे कापताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ही कारवाई झाल्यास लाकडे तोडता तोडता एक वर्षापर्यंत खडी फोडायला जेलमध्ये जावे लागेल!

१ वर्षापर्यंत कारावासाची तरतूद

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध असून या अपराधाकरिता कमीतकमी १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, यासाठी कमीतकमी १ हजार रुपये ते ५ हजार रुपये एवढा दंडदेखील होऊ शकतो.

बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात कठोर भूमिका

हे लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अशा प्रकारची वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान खात्यातील उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहाय्यक(Horticulture Assistant) यांनी अधिक सतर्क रहावे व अधिक सजगपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आदेश उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिले आहेत. तसेच, नियमबाह्य पद्धतीने वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरु करावी, असेही आदेश परदेशी यांनी विशेष परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना दिले आहेत.

पर्यावरणपूरक होळी साजरी करा!

होळीसाठी झाडांची कत्तल होत असल्याने झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचते. या बाबींना प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'होळी' सणाच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहाण्याच्या सूचना केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतिकात्मक 'होळी' साजरी करावी, असेही आवाहन परदेशी यांनी केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या