'जीववन' (JeevOne) या प्राणी कल्याण संस्थेने आणि युवा सेना ॲनिमल वेल्फेअर फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'जीववन लाइफलाइन' (JeevOne Lifeline) या ईव्ही बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
प्राणी बचाव मोहीम देशभरात वाढत आहेत. तरी जखमी किंवा आजारी प्राण्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी परवडणारी आणि तत्काळ वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. हीच समस्या लक्षात घेऊन सहा महिन्यांच्या नियोजनानंतर 'जीववन लाइफलाइन'ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली.
संस्थेचे संस्थापक आणि प्राणी कल्याण उद्योजक संकेत भट्ट यांनी सांगितले की, "प्राण्यांच्या जीवावर बेतलेल्या प्रत्येक क्षणी मदत लवकर पोहोचणे आवश्यक आहे. ही बाईक अॅम्ब्युलन्स त्याच उद्देशाने तयार करण्यात आली आहे."
या प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबईतील विविध भागांमध्ये सुमारे 10 ईव्ही बाईक अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात येणार आहेत. या माध्यमातून कार्यपद्धतीतील अडचणी समजून घेणे, प्रतिसाद यंत्रणा अधिक प्रभावी करणे आणि भविष्यात हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात विस्तारण्याचा मानस आहे.
जखमी आणि आजारी प्राण्यांना जलद आपत्कालीन मदत
प्राणीप्रेमी, स्वयंसेवक आणि रेस्क्यू करणाऱ्यांसाठी परवडणारी वाहतूक सुविधा
पशुवैद्यकीय उपचारांपर्यंत जलद पोहोच
तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा व्यवस्थापन आणि ट्रॅकिंग
स्वयंसेवी संस्था आणि प्राणी कल्याण गटांना अधिक प्रभावी मदत
या पहिल्या ईव्ही बाईक अॅम्ब्युलन्सचे औपचारिक उद्घाटन ठाण्यात युवा सेनेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा दीर्घकालीन उद्देश म्हणजे महाराष्ट्रभर प्राण्यांसाठी ईव्ही बाईक अॅम्ब्युलन्सचे जाळे उभारणे. यासाठी उद्योग संस्था, CSR भागीदार, सामाजिक संस्थांबरोबरच दानशूर व्यक्तींना अॅम्ब्युलन्स प्रायोजित करण्याचे आणि या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा