दक्षिण मुंबईतल्या 'या' परिसरातील पाणीटंचाई दूर होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दक्षिण मुंबईतील काळबादेवी, फोर्ट, सीएसएमटी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. या परिसरतील पाणीटंचाई आता दूर होणार आहे. आझाद मैदानाखाली पाण्याचे भूमिगत जलाशय असून त्यावर सुमारे २९ वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले पंप आता जुने झाले आहेत. हे पंप बदलून इथं नवीन पंप बसवण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिका (bmc) मुख्यालयासमोरच्या आझाद मैदानाखाली १० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलाशय आहे. १९९२ पासून कार्यरत असलेल्या या जलाशयातून काळबादेवी विभागाला पहाटे ४.३५ ते ६.५०, काळबादेवी व बोरिबंदर विभागाला संध्याकाळी ४.३५ ते ६.२० व फोर्ट विभागाला रात्री ८.२५ ते ९.४५ दरम्यान पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या विभागातून पाणी कमी येण्याच्या तसेच, पाण्याला कमी दाब असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत.

काळबादेवी, फोर्ट परिसर हा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा आहे. दोन्ही भागांत व्यावसायिक कार्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेतर्फे पुरवठा केला जाणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्यानं अनेक व्यापारी व खासगी कार्यालये विहिरीतील पाणी विकत घेतात.

दक्षिण मुंबईत या पाण्याची जोरदार विक्री चालते. पालिका मुख्यालय असलेल्या परिसरातच पाणीटंचाई भासत असल्याबाबत दक्षिण मुंबईतील नगरसेवकांनी पालिकेत हा प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या जल अभियंता विभागाने याची दखल घेत पाण्याचा दाब वाढवण्यासाठी आझाद मैदान जलाशयातील जुने पंप बदलून नवीन पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

जलाशयात सध्या १३५० क्युमीटर प्रतितास व ४२.७ मीटर दाबक्षमतेचे पाच पंप कार्यान्वित आहेत. गेली २९ वर्षे हे पंप सुरू असल्यामुळे यांची नियंत्रण उपयुक्त क्षमता व आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या जलाशयात १४८५ क्युमीटर प्रतितास व ५० मीटर दाबक्षमता असलेले नवीन पंप बसवण्यात येणार आहेत.

१.६९ कोटींचा खर्च

येत्या ९ महिन्यांत हे पंप बसवण्यात येणार असून यासाठी सुमारे एक कोटी ६९ लाख रुपये खर्च येणार आहे. या कामामुळे पाण्याचा दाब वाढणार असून या भागातील पाणीटंचाई दूर होणार असल्याचा विश्वास जलअभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या