लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड आगीप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले.
या आगीमध्ये एकूण १४ जण मृत्यूमुखी पडले असून ५५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. या घटनेची माहिती कळताच मुंबई महापालिका आयुक्तांकडून घटनेबाबतची माहिती जाणून घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
आग लागलेल्या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा बसवण्याकडे, नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चालढकल करणारे मुंबई महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.