कमला मिल आगप्रकरणी विशाल कारियाच्या सीबीआय चौकशीची अामदार नितेश राणे यांची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कमला मिल्स आग प्रकरणातील मास्टर माईंड हे विशाल कारिया आणि बाळा खोपडे हेच असून कारियाच्या इमारतीमध्ये मोजोस बिस्त्रो या पबमालकाच्या गाड्या सापडल्या आहेत. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यापासून विशाल कारियानं कुणाकुणाला फोन केले, यासाठी त्याची सीबीअाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अामदार नितेश राणे यांनी केली अाहे.

कमला मिलप्रकरणात बुकीचाही समावेश?

कमला मिल कंपाउंड आग दुर्घटनेला मंगळवारी वेगळंच वळण मिळालं असून यात एका क्रिकेट बुकीचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मंगळवारी पहाटे विशाल कारिया या युवकाला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती नितेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

अागीच्या तीव्रतेनुसार कारवाई होत नाही

अाग दुर्घटना मोठी असली तरी त्या तीव्रतेनुसार कारवाई होत नाही. १० दिवसांनंतर विशाल कारियाला अटक झाली, पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार. त्यामुळे या प्रकरणाची सीबीअायच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी अाहे. अाग लागली त्या दिवसापासून विशालने कुणाकुणाला फोन केले, त्याच्या मागे कुणाचा हात अाहे. त्याचा मोबाईल अाणि व्हाॅट्स-अॅप सीडीअार रिपोर्ट तपासला जावा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.

तर विधीमंडळातही तीव्र पडसाद उमटतील

काही महिन्यांपूर्वी अंधेरीतून जोजो आणि डीके या बुकींना अटक करण्यात आली होती. या डीके ऊर्फ दीपक कपूरच्या मोबाईल सीडीआर रिपोर्टमध्ये विशाल कारियाचा नंबर आहे. विशालचे अनेक क्रिकेटपटू अाणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंध अाहेत. त्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हायलाच हवी. तसे न झाल्यास, याचे तीव्र पडसाद विधीमंडळातही उमटतील, असा इशाराही राणे यांनी दिला.

आयुक्तांवरील दबावप्रकरणी नितेश राणेंची न्यायालयात जनहित याचिका

कमला मिल्स कम्पाऊंडमधील अागप्रकरणी कारवाई न करण्यासाठी दबाव अाणणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, यासाठी राणे यांनी आज उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. आयुक्त हे मुंबईकरांना माहिती देण्यासाठी बांधील आहेत, त्यामुळे किमान न्यायालयात तरी त्यांनी ती नावे उघड करावीत, असं आवाहन राणे यांनी केलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या