कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजो ब्रिस्टो पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जी/ दक्षिण विभागातील ५ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे. तर जी/ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. प्रशांत सकपाळ यांची बदली के/पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त पदी झाली. तर के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त यांची बदली जी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त पदी झाली.

विशेष आदेशाने कारवाई

मिल कंपाऊंडमधील रेस्टाॅरंट आणि पबच्या अनधिकृत बांधकामाकडे तसेच अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर अजोय मेहता यांनी विशेष आदेश काढत ही कारवाई केली आहे.

कुणाचा समावेश?

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही माहिती दिली. यामध्ये जी/ दक्षिण विभागाचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, कनिष्ठ अभियंता धर्मराज शिंदे, इमारत कारखाना विभागाचे दिनेश महाले, सतीश वडगिरे आणि सहायक अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

चौकशी अहवालाचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश देत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती २० ते २५ दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या