अखेर किंगफिशरचा मृत्यू...

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'त्यानं' लवकर बरं होऊन पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालावी. झाला गेला त्रास विसरून यशाची नवंनवी क्षितिजं गाठावी, अशी विश्वनिर्मात्याकडे प्रार्थना करणारे शेकडो हात भक्तीभावाने जोडले गेले होते. परंतु डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याचं शरीर उपचारांना दादच देत नव्हतं. अखेर शुक्रवारी दुपारच्या सुमारास 'किंगफिशर'ची प्राणज्योत मालवली.

किंगफिशर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर भारतातून पळ काढलेला तथाकथित मद्यसम्राट आणि देशातील लोकप्रिय मद्याचा ब्रँड येतो. पण हा किंगफिशर असा होता की त्यानं लळा लावलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून आसवं काढली. किंगफिशर अर्थात खंड्या या पक्ष्याला श्वसनाचा त्रास होत असल्यानं गुरूवारी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता हा किंगफिशर रुग्णालयात कसा आला? याविषयीची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल.

तर, त्याचं झालं असं की, परदेशाहून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीच्या घराच्या खिडकीत हा छोट्या आकाराचा किंगफिशर बसला होता. त्याला श्वास घेता येत नसल्याचं त्याला जाणवल्यानं त्यानं थेट परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधला. यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी तातडीने रुग्णवाहिका घेऊन किंगफिशरला घेण्यासाठी तेथे पोहोचले. गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास त्याला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. या किंगफिशरचं वयंही फारसं नव्हतं. त्याच्यावर उपचार करण्यात आल्यावर गुरुवारचा पूर्ण दिवस इवलासा किंगफिशर ठणठणीत होता. पण, शुक्रवारी दुपारच्या दरम्यान त्याचा पुन्हा श्वास कोंडायला लागला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला.

मुंबईतील कोंदट, दमट वातावरणात जसे मनुष्य थकतात तसेच पशुपक्षीही थकतात. याचप्रकारे थकून हा किंगफिशर एका व्यक्तीच्या घराच्या खिडकीवर बसला होता. या व्यक्तीने किंगफिशरची व्यथा सांगितल्यावर आम्ही तत्काळ आमची रुग्णवाहिका त्याला घ्यायला पाठवली. त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याला तातडीने औषधही पाजण्यात आलं. त्याला कुठेही लागलं नव्हतं. पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक पक्षी इकडे येतात. त्यात कोकीळा, मैना, घार, गरुड, पोपट, बगळा, घुबड अशा पक्षांचा जास्त समावेश आहे. मुंबईत घरटी बांधण्यासाठी लागणाऱ्या झाडांची संख्या कमी झाल्याने ते आकाशातच भ्रमंती करत राहतात. त्यात त्यांना कधी पाणी उपलब्ध होत नाही. आकाशात उडून थकलेले पक्षी थकून मग खाली कोसळतात. त्यांना काही पक्षीप्रेमी रुग्णालयात आणतात.
- डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, पशुवैद्यकीय रुग्णालय, परळ

पुढील बातमी
इतर बातम्या