कुरार भुयारी मार्गाचं होणार रुंदीकरण

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुरार - कुरार गाव ते मालाड स्टेशनचा प्रवास आता सुखाचा होणार आहे. चौपदरी रस्ता, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि अवजड वाहनांनाही सहज ये-जा करता येईल, अशा प्रकारे भुयारी मार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार असल्यामुळे हे शक्य होणार आहे.

दिंडोशी, मालाड पश्चिम द्रुतगती मार्गावरील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचं उद् घाटन मंगळवारी संध्याकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २६ कोटींच्या खर्चातून हे सुसज्ज रुंदीकरण करण्यात येणार आहे. कुरार गाव येथील रहिवाशांना मालाड स्टेशन गाठण्यासाठी चिंचोळ्या भुयारी मार्गातून जावं लागतं. येथील लोकवस्तीही प्रचंड वाढल्यानं इथे होणाऱ्या गर्दीतून चालणंही कठीण होतं. त्यामुळे ३० मीटर रूंद आणि चार मीटर उंच असा भुयारी मार्ग बनवण्यात येणार आहे. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे लाखो कुरारवासीयांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी सुसज्ज मार्ग मिळणार आहे. या वेळी महिला विभाग संघटक साधना माने यांच्यासह नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख शिवसेना-पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या