घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी केली तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बचावकार्याला वेग देतानाच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बचावकार्यात मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF, मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका सेवा सहभागी आहेत.
मात्र, घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या रस्त्यावरून एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला जाणे शक्य असल्याने बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मलब्याखालून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, महापौर ऋतु तावडे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
घटनास्थळी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.
हेही वाचा