कल्याण-डोंबिवलीत १९ जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढवला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ठाण्यापाठोपाठ  कल्याण आणि डोंबिवलीतही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. याआधी कल्याण डोंबिवलीमध्ये २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन होता. आता लॉकडाउन आणखी सात दिवस वाढवण्यात आला आहे. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केली आहे. 

 या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहेत.कल्याण डोंबिवलीत २ ते १२ जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु होती. मेडिकलची सुरु राहण्याची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्याप्रमाणेच सगळे नियम लागू राहतील, असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. 

कल्याण डोंबिवलीमध्ये शुक्रवारी कोरोनाचे ६०६ नवीन रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ५२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ११५३७  झाली असून यामध्ये ५२९२  रुग्ण उपचार घेत असून ६०७३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ६०६ रूग्णांमध्ये  कल्याण पूर्व -११३, कल्याण प.-१९०, डोंबिवली पूर्व -१३७, डोंबिवली प-१०५, मांडा टिटवाळा- १०, मोहना- ४१ तर पिसवली येथील १० रुग्णांचा समावेश आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या