घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासून लागू झाली आहे. यापूर्वी १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. 

दर वाढीनंतर दिल्लीमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपये, कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत ह्या सिलिंडरची किंमत १६१८ रुपये झाली आहे.

जानेवारीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. फेब्रुवारीमध्ये किंमत वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. 

एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत २७५ रुपयांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. 

पुढील बातमी
इतर बातम्या