मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाविकास आघाडी सरकराचा यंदा तिसरा अर्थसंकल्प सादर झाला असून, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात हा अर्थसंकल्प मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक प्रकल्पांकरीता निधींची तरतुद करण्यात आली आहे. तसंच, या अर्थसंकल्पात सरकारनं मराठी भाषेच्या संवर्धन तसेच प्रसार आणि प्रचारासाठी विशेष तरतुद केली आहे.

मराठी भाषेच्या विकास, संवर्धनासाठी मराठी भाषा भवनची निर्मिती मुंबईत करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी या भवनाच्या निर्मितीसाठी देण्यात येणार आहे. तसेच २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

मराठी भाषा भवनाच्या निर्मितीसोबत मराठी भाषा संशोधनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मराठी भाषा संशोधन उपकेंद्रासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून मराठी भाषा भवनची मुंबईतील निर्मिती, नवी मुंबईत मराठी भाषा संशोधन उपकेंद्र, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव तसंच आस्थापनांचे नामफलक यासाठीची अंमलबजावणी तसेच आर्थिक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही केंद्र सरकारकडे राज्य सरकार पाठपुरावा करत आहे, असे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

पुस्तकाचे गाव

मराठी साहित्य वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचे गाव या धर्तीवरच राज्यात पुढाकार घेण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरू करण्याचा मानस राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मांडला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या