सकल मराठा समाजाचे उपोषण मागे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे उपोषण रविवारी मध्यरात्री मागे घेण्यात आले. राज्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 'दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण न केल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू,' असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला देण्यात आल्याचे मराठा मोर्चाचे सदस्य संभाजी पाटील यांनी सांगितले.

सारथी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जुलै महिन्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृहांची जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यात येईल आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल, आदी सकल मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरुपात देण्यात आल्या आहेत.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र उपोषणकर्त्यांनी वैदयकीय मदत घेण्यास नकार दिला होता. याची दखल राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनंतर उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कोपर्डी हत्याकांड आणि शेतकरी प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना सांगितल्याची माहिती संभाजी पाटील यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या