समुद्रातील शिवस्मारकाला मराठा सेवा संघाचा विरोध, सरकारला लिहिलं पत्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला पर्यावरणप्रेमींसह अन्य काही संघटनांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून स्मारकाचं काम सुरू आहे. असं असताना आता पुन्हा या समुद्रातील स्मारकाला असलेला विरोध तीव्र झाला आहे.

स्मारकाच्या पायाभरणीच्या वेळेस झालेल्या बोट अपघातानंतर हा विरोध वाढला आहे. मराठा सेवा संघाने समुद्रातील स्मारक सुरक्षित नसल्याचं म्हणत विरोध सुरू केला आहे. संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी यासंबंधीचं एक पत्रही सरकारला पाठवलं आहे. त्यानुसार समुद्रात नव्हे तर जमिनीवर स्मारक बांधण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

स्मारकाला विरोध

समुद्रात स्मारक बांधण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. पण एवढा खर्च करून बांधण्यात येणारं हे स्मारक सहा महिने बंद राहणार. तेव्हा शिवभक्तांना हे स्मारक कसं पाहता येणार. त्यातच समुद्रात हे स्मारक असल्याने तिथं पोहण्यासाठी स्मारक पाहण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागेल. अशा वेळी खेड्यापाड्यांतील गोर गरीब जनतेला हा खर्च कसा परवडणार? असा सवाल करत खेडेकर यांनी समुद्रातील स्मारकाला विरोध केला आहे.

स्मारक जमिनीवर बांधा

हे स्मारक सुरक्षित ठिकाणी अर्थात जमिनीवर असावं, अशी मागणी सुरुवातीपासूनच मराठा सेवा संघाची होती. पण आता बोट अपघातानंतर हे सिद्ध झाल्याचं खेडेकर यांनी म्हटलं आहे. तर स्मारक सुरू झाल्यानंतर किती अपघात होतील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासर्व गोष्टी लक्षात घेता स्मारक जमिनीवर बांधावं, अशी मागणीही त्यांनी या पत्रातून सरकारला केली आहे. स्मारकासाठी त्यांनी राजभवनाची जागा सुचवली आहे. राजभवन इतरत्र हलवत राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधावं, अशी मागणी त्यांची आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या