मुंबईच्या पश्चिम द्रूतगती मार्गावर सांताक्रूझमध्ये दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुधाचा टँकर पलटला. या अपघातामुळे द्रूतगती मार्गावर काही प्रमाणात वाहतूककोंडी झाली. परंतु पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
वांद्र्याच्या दिशेने वेगाने जात असलेल्या टँकर चालकाचं वळणावर नियत्रंण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा टँकर बोरिवलीहून मुंबईच्या दिशेने येत होता. विमानतळानजीक ही दुर्घटना घडल्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान वाहतूक नियंत्रणात आणत असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.