मरीन ड्राइव्ह 12 लेन रस्ता विस्तार योजना सध्या स्थगित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

Mumbai Metropolitan Region Development Authority अर्थात MMRDA ने मरीन ड्राइव्हवरील नेताजी सुभाषचंद्र बोस रोड 6 लेनवरून 12 लेन करण्याचा प्रस्ताव सध्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट जोडणारा जुळ्या बोगद्यांचा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरच या रस्ताविस्ताराबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह ट्विन टनेल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच किती लेन वाढवायच्या आणि किती अंतरापर्यंत रस्ता रुंद करायचा याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

ईस्टर्न फ्रीवे आणि मुंबई कोस्टल रोडला जोडणारा हा ट्विन टनेल प्रकल्प जून 2028 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे.

MMRDA मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या हा प्रकल्प राबवणे घाईचे ठरेल. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर आम्ही ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह ट्विन टनेल प्रकल्प सुरू केला आहे. आधी बोगदे पूर्ण होऊ द्या, त्यानंतर रस्ताविस्ताराबाबत निर्णय घेतला जाईल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एप्रिल 2025 मध्ये या रस्ताविस्तार योजनेला मंजुरी दिली होती. कोस्टल रोड आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन मरीन ड्राइव्हवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या योजनेनुसार National Centre for the Performing Arts ते कोस्टल रोड प्रवेशद्वारापर्यंतचा सुमारे तीन किलोमीटरचा नेताजी सुभाषचंद्र बोस रोड सहा लेनवरून 12 लेन करण्यात येणार होता. यासाठी अरबी समुद्राचा काही भाग भराव टाकून विकसित करणे आणि विद्यमान मरीन ड्राइव्ह प्रोमेनेडमध्ये बदल करणे आवश्यक होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की, “हा प्रकल्प शहराच्या पुढील 25 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. कोस्टल रोड टनेलमुळे पीक अवर्समध्ये या भागात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मात्र, क्वीन्स नेकलेसचे स्वरूप बदलणार नाही याची काळजी घेतली जाईल.”

दरम्यान, मरीन ड्राइव्ह परिसरातील रहिवाशांनी हा प्रस्ताव स्थगित झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मरीन ड्राईव्ह रेसिडन्ट्स असोसिएशनचे (Marine Drive Residents’ Association) उपाध्यक्ष अशोक गुप्ता (Ashok Gupta) यांनी हा प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचे म्हटले. “अशा प्रकल्पाचे तांत्रिक पैलू पूर्णपणे अभ्यासल्याशिवाय घोषणा करण्यात आली होती,” असे ते म्हणाले.

तसेच नरिमन पॉईंट चर्चगेट असोसिएशनचे (Nariman Point Churchgate Citizens Association) अध्यक्ष अतुल कुमार (Atul Kumar) यांनीही आधी विद्यमान वाहतूक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.

“फक्त वाहतूक कोंडी होते म्हणून अधिक लेन वाढवणे हा उपाय नाही. नरिमन पॉइंट आणि कफ परेडला जोडणारा नवीन दुवा अधिक महत्त्वाचा ठरू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.


हेही वाचा

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर ‘ReRoot’ उपक्रमाची सुरुवात

ठाणे : माजीवाडा परिसरात वाहतूक निर्बंध लागू

पुढील बातमी
इतर बातम्या