मनसेच्या महापालिकेतील दालनाला लागणार टाळे

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मनसेच्या ६ नगरसेवकांच्या शिवसेना पक्षातील विलिनीकरणाला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्याची घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. पण या घोषणेनंतर गटनेतेपदासाठी फिल्डिंग लावणाऱ्या संजय तुर्डे यांनी आपली हार मानली. गटनेते होण्याची शक्यताच धुसर झाल्यामुळे महापालिकेतील मनसे पक्ष कार्यालय १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच या कार्यालयातील दोन्ही मराठी कामगारांना घरी बसण्याचे आदेश देत तुर्डे यांनी महापालिकेतील मनसेच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या कर्मचाऱ्यांना घरी बसवलं

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ते सर्व नगरसेवक मनसेचेच असल्याचा दावा करत मनसेने आपल्या एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांची गटनेतेपदी निवड केली होती. पण या सहाही नगरसेवकांच्या शिवसेना विलिनीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर तुर्डे यांनी महापालिकेतील मनसे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगून टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला पक्ष कार्यालय रिकामी करण्यासंदर्भात महापालिकेच्या देखभाल विभागाच्या तसेच चिटणीस विभागाकडून नोटीस जारी झालेली नसतानाही मनसेने हे कार्यालय रिकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता त्या कर्मचाऱ्यांचं काय?

मनसेच्या कार्यालयात सध्या एक लिपिक आणि एक शिपाई असे दोन कर्मचारीवर्ग आहे. या दोघांनाही त्यांनी १ फेब्रुवारीपासून कामावर न येण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत मनसेचे संजय तुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा देत 'महापालिकेने मला कार्यालय बंद करण्याची कोणतीही नोटीस दिलेली नाही. पण काही दिवसांमध्ये ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना घरी जायला सांगण्याऐवजी मी आताच सांगून टाकलं आहे,' असं त्यांनी सांगितलं.

मनसेचं कार्यालय आहे, पण त्यात पक्षाचं काम होत नाही. कर्मचारी बसून राहतात. त्यांच्या हाताला काम नाही आणि या कार्यालयाचा लाभ अन्य कुणीतरी घेत असतात. पक्षाच्या लोकांनाही याचा फायदा होत नसल्यामुळे ते बंद करण्यात येणार आहे. हे कार्यालय मनसेच्याच ताब्यात असून आम्ही जेव्हा जाऊ तेव्हाच उघडू, असंही त्यांनी सांगितलं. या कर्मचाऱ्यांना जरी आता काढण्यात आलं असलं, तरी भविष्यात पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाल्यास या दोघांचा प्रथम विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या