मनसेच्या Maharashtra Navnirman Sena कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पावसाळापूर्व नाला सफाई मोहिमेचा “पोलखोल” करण्यासाठी नेरुळमध्ये अनोखे आंदोलन केले.
सेक्टर 19, नेरुळ पूर्व येथील गाळाने भरलेल्या नाल्यात उतरून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या नाला सफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे आंदोलन मनसे शहर सचिव सचिन कदम (Sachin Kadam) आणि विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड (Umesh Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. कार्यकर्त्यांनी नाल्यात तब्बल तीन ते चार फूट गाळ साचल्याचा दावा केला. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या पाच मोठ्या पाइपपैकी चार पाइप पूर्णपणे गाळाने तुंबल्याचा आरोप करण्यात आला.
महापालिकेच्या दाव्यांवर टीका करत सचिन कदम यांनी नाला सफाई केवळ कागदावर होत असल्याचा आरोप केला. ठेकेदारांना फायदा मिळावा यासाठीच टेंडर काढले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
आंदोलनादरम्यान उमेश गायकवाड यांनी दुर्बीण लावून नाल्यांची पाहणी करण्याचा प्रतीकात्मक प्रकार केला. “दुर्बिणीतूनही साफसफाई दिसत नाही,” असा टोला मनसे कार्यकर्त्यांनी लगावला.
या आंदोलनात निलेश साईंदाणे, प्रणित डोंगरे, बाळाजी लांडगे, अमोल सारडे, शंकर घोंगडे-पाटील, शिवा गिरी, आकाश गायकवाड, भरत गायकवाड, अरबाज खान, सनी गणेशपुरे आणि ज्येष्ठ नागरिक दीपक काटकर उपस्थित होते.
पुढील सात दिवसांत नाला सफाई पूर्ण न झाल्यास नाल्यातील गाळ महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.
हेही वाचा