मुंबईत मृतांच्या आकडेवारीत वाढ, रुग्णांच्या संख्येतही वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृतांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. कोरोनामुळे सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा शंभरीपार गेला आहे. मृतांपैकी ८७ टक्के रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयविकार असे आजार असल्याचे आढळून आले आहे.

मुंबई शहरात दिवसभरात १५० नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा १ हजार ५४९ वर गेला आहे. मुंबईत ९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ६ महिला असून ३ पुरुष आहेत. तर ४७ वर्षांचा एक पुरुष व ५१ वर्षांंची एक महिला यांना कोणतेही आजार नव्हते. तर ७ जणांना दीर्घकालीन आजार होते. 

ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदय विकार असे आजार आहेत त्यांनी घरात राहावे, तसेच हे आजार नियंत्रणात राहावे म्हणून उपचार घ्यावेत असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. वयोवृद्ध व दीर्घ आजार असणाऱ्यांना खोकला, ताप, श्वास घेण्यास अडथळा अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी तत्काळ पालिकेच्या करोना उपचार केंद्रात दाखल व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वरळी पाठोपाठ भायखळा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल येथील रुग्णसंख्या वाढत आहे. या विभागाचा समावेश असलेल्या ई विभागात १२० रुग्ण आढळले आहेत. या विभागातील संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी भायखळा येथील ‘रिचर्डसन अँड क्रुडास’ या  कंपनीत चार मजली इमारतीत पालिकेने २०० खाटांचा कक्ष तयार केला आहे. त्याची क्षमता आठवडय़ाभरात ७०० करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

धारावीमध्ये २४ तासात ६ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा शीव रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर अन्य ५ रुग्णांपैकी एक शुश्रूषा रुग्णालयातील परिचारिका आहे. नेहरू चाळ येथील एका ६० वर्षांच्या पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या