'या' वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाचा (coronavirus) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोना (covid 19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ३१ ते ४० या वयोगटामधील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गाचं प्रमाण या वयोगटामध्ये २१.५३ टक्के असून त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये हे प्रमाण १८.१० टक्के इतके दिसून आलं आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये पन्नास ते साठ या वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक होतं. अनलॉकनंतर कामानिमित्त तसंच शैक्षणिक कारणांसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं कोरोना संसर्ग झालेल्या तरुण रुग्णसंख्येचं प्रमाण अधिक दिसून येतं. यातही सहआजार असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे, तसेच वैद्यकीय उपचारासाठी तरुण खूपच विलंबाने जात असल्याचे दिसून येत आहे.

३१ ते ४० या वयोगटामध्ये राज्यातील ७ लाख १२ हजार २१५ व्यक्तींना संसर्ग झाला असून ४१ ते ५० या वयोगटामध्ये ५ लाख ९७ हजार ९७७ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. २१ ते ३० या वयोगटामध्येही संसर्गाचे प्रमाण अधिक असून या गटातील ५ लाख ५७ हजार ९१४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण टक्केवारीमध्ये १६.८५ टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे. त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोगटातील १५.८८ टक्के म्हणजे ५,२२,८८५ व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांकडून संसर्गाची लागण ज्येष्ठ नागरिकांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात ३३ लाख ७३२ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून ७१ ते ८० या वयोगटामध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ५.२७ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. राज्यातील ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. कोरोना संसर्गासाठी केलेल्या एकूण चाचण्यांमध्ये १७ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या