मुंबई उच्च न्यायालयात MPCB ने सांगितले की, हावरे सिटी टाउनशिपमधील रहिवाशांनी RMC प्लांट, वाहनांची वर्दळ आणि बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ व आवाजाचे प्रदूषण होत असल्याची तसेच निर्धारित वेळेनंतरही काम सुरू असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 3 जुलै रोजी कंपनीला नोटीस देण्यात आली.
MPCB ने कंपनीला प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे, निर्धारित वेळेनंतर RMC प्लांट बंद ठेवण्याचे आणि सात दिवसांत पालन अहवाल (Compliance Report) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही बाब पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान समोर आली. त्यांनी RMC प्लांटमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा केला. RMC प्लांट, कास्टिंग यार्ड आणि कामगारांच्या निवास शिबिराचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
25 जून रोजी MPCB च्या संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीत कंपनीने धूळ नियंत्रणासाठी फॉगिंग सिस्टम, पाण्याची फवारणी, झाकलेली साठवण व्यवस्था आणि संरक्षक कवच उभारल्याचे आढळले. मात्र, धूळ आणखी कमी करण्यासाठी प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर अतिरिक्त स्प्रिंकलर्स बसवणे, उघडे भाग धातूच्या पत्र्यांनी झाकणे आणि ताडपत्रीने फटी बंद करणे अशा अतिरिक्त उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत राबविण्यात येत असलेला ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालील भागातून जाणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा