माहिम कॉजवे परिसरातील मृदुंग आचार्य मैदानाच्या दुरवस्थेमुळे मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या या मैदानात महापालिकेच्या टनेलच्या प्रोजेक्टमध्ये तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातच मैदानात मातीच न टाकल्यामुळे या पाण्याच्या टाक्या उघड्या पडल्या आहेत. एकतर मैदानात कमी माती आणि त्यातच उघड्या पडलेल्या टाक्यांचे झाकण यामुळे खेळायचं तरी कुठे? असा प्रश्न मुलांसह त्यांच्या पालकांनाही पडला आहे.
आम्हाला या मैदानात माती टाकून हवी आहे. घराच्या जवळ मैदान असूनही आम्हाला इथे खेळता येत नाही. मैदानात माती नसल्यामुळे खेळताना आम्ही पडलो तर दुखापत होते. मैदानाच्या भिंतीची पडझड झाल्यामुळे गर्दुल्ले आणि कुत्र्यांचा इथे नेहमी वावर असतो. त्यामुळे खेळायला सुरक्षित वाटत नाही.
वैभव दांडेकर, रहिवासी
या मैदानाची दुरवस्था महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी "मैदान प्लेन करून त्यावर लाल माती टाकण्यात येणार आहे. सर्व दुरुस्ती करताना मैदानाच्या संरक्षण भिंतीचे काम देखील करुन घेण्यात येईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि पावसाळ्याच्या आधी हे मैदान दुरुस्त केले जाईल", अशी प्रतिक्रिया दिली.