मुंबईतील 110 वर्षांची परंपरा असलेल्या पारशी डेअरी फार्मवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर डेअरीचा फूड बिझनेस लायसन्स तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
FDA च्या पथकाने पारशी डेअरी फार्मच्या उत्पादन केंद्राची दोन दिवस तपासणी केली. यावेळी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
उत्पादन केंद्रात अस्वच्छ परिसर, भिंतींवर बुरशी, डासांचा प्रादुर्भाव, अपुरी स्वच्छता व्यवस्था तसेच अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे नमूद करत FDA ने तातडीने परवाना निलंबित केला.
1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध डेअरी ब्रँडपैकी एक आहे. दूध, तूप, लोणी, कुल्फी आणि पारंपरिक दुग्धजन्य पदार्थांसाठी ही संस्था ओळखली जाते. परवाना निलंबित झाल्यामुळे आवश्यक सुधारणा होईपर्यंत आणि FDA कडून पुन्हा तपासणी करून मंजुरी मिळेपर्यंत कंपनीला अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करता येणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्रभर सुरू असलेल्या FDA च्या विशेष मोहिमेत अनेक नामांकित खाद्य व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी के. रुस्तम आईस्क्रीम, नूर मोहम्मदी हॉटेल आणि शालीमार रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवरही अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनांमध्ये त्रुटी आढळतील त्यांना त्या दुरुस्त करून FDA ची मंजुरी मिळाल्यानंतरच पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.
हेही वाचा