विलेपार्लेतील 12 मजली इमारतीला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात मंगळवारी रात्री 12 मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर भीषण आग लागली. या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला रात्री 10 वाजून 2 मिनिटांनी मिळाली. रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले. त्यानंतर आगीची तीव्रता वाढल्याने रात्री 10 वाजून 16 मिनिटांनी ती लेव्हल-2 घोषित करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर रात्री सुमारे 1 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

आग सुमारे 4 हजार चौरस फूट परिसरात पसरली होती. मात्र, ती वीजेच्या वायरिंग आणि इन्स्टॉलेशन, एसी युनिट, घरातील साहित्य, सोफा, बेड, फॉल्स सीलिंग आणि स्वयंपाकघरातील भांड्यांपुरतीच मर्यादित राहिली.

या दुर्घटनेत एकूण आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोघांना कूपर रुग्णालयात, तर सहा जणांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कूपर रुग्णालयात 30 वर्षीय अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे आणि 29 वर्षीय शिवम द्विवेदी यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अडीच वर्षांच्या अबीर आणि 23 वर्षीय अंकिता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमींमध्ये पार्थ (32), हिरेन (64), यशस्वी (33) आणि अभिषेक यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यशस्वी आणि अभिषेक यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या