मुंबईतील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीवर BMCचा नवा प्रस्ताव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मृत प्राण्यांचे संकलन आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र ट्रॉलीसह कंत्राटदार नियुक्त करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रस्तावावर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, मृत प्राण्यांचे वेळेत संकलन करून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे ही महापालिकेची कायदेशीर जबाबदारी असून, दुर्गंधी, साथीचे रोग आणि अस्वच्छता टाळण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे.

प्रशासनाने सांगितले की, यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रायोगिक (पायलट) प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ही सेवा आता संपूर्ण मुंबईत विस्तारण्याचा प्रस्ताव आहे.

नगरसेवकांचे सवाल

बैठकीत शिवसेना (शिंदे गट)चे गटनेते अमेय घोले यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. मृत प्राण्यांची नेमकी कुठे विल्हेवाट लावली जाते, कोणत्या प्रकारच्या प्राण्यांचा या सेवेत समावेश आहे आणि मृत उंदरांबाबत तक्रार केल्यास संबंधित विभाग अधिकारक्षेत्र नसल्याचे सांगून जबाबदारी का झटकतो, असा सवाल त्यांनी केला.

एआयएमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी कंत्राटदारांच्या कामावर प्रभावी देखरेख ठेवण्याची मागणी केली. प्रत्येक तक्रारीवर निश्चित वेळेत कारवाई होते का आणि मृत प्राण्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते का, यासाठी सक्षम निरीक्षण यंत्रणा असावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनीही या सेवेतील त्रुटींवर बोट ठेवले. मृत प्राणी उचलण्यासाठीची वाहने अनेकदा उपलब्ध नसतात. विलंब झाल्याने काही वेळा मृत प्राणी पुन्हा त्या ठिकाणीच आणून ठेवले जात असल्याच्या तक्रारी असून, यामुळे कंत्राटदारांच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेचे स्पष्टीकरण

अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, संपूर्ण मुंबईत ही सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र ट्रॉलीसह कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळे मृत प्राण्यांचे वेळेत संकलन आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा

मुंबईतील पाणी तुंबण्यावर 13 हजार कोटींची योजना

पुढील बातमी
इतर बातम्या