गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची (bmc) तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी महापालिकेचे सुमारे 12 हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करणार आहेत. 

तसेच 71 नियंत्रण कक्ष, 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांसह 204 कृत्रिम तलाव आणि इतर विविध सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

गणेश विसर्जनासाठी पालिकेने विशेष पथके तयारी केली आहे. प्रशासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 192 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने वॉच टॉवरउभारण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी 72 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.

गिरगाव चौपाटी येथे दरवर्षीबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) डी विभागामार्फत भाविकांना विविध नागरी सेवा व सुविधा पुरविल्या जातात.

रविवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ.अमित सैनी यांनी या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी केली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन (ganesh visarjan) केले जाते. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येणारी वाहने वाळूत अडकू नयेत, यासाठी चौपाटीच्या काठावर 478 स्टील प्लेट्सची व्यवस्था करण्यात आली असून, छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी 43 जर्मन तराफ्यांचीही विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौपाटीवर 761 जीवरक्षकांसह 48 मोटारबोटी तैनात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले निर्माल्य हार, फुले आदींचे संकलन करण्यात आले आहे.

75 प्राथमिक उपचार केंद्रांसह 67 रुग्णवाहिकाही आरोग्य विभागाकडून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी 'BEST' च्या सहकार्याने खांबांवर आणि उंच ठिकाणी सुमारे 1,097 फ्लडलाइट्स आणि 27 सर्चलाइट्स बसवण्यात आले आहेत.

आंघोळीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 127 फिरती स्वच्छतागृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनांसह प्रशिक्षित मनुष्यबळ महापालिकेकडून तैनात करण्यात आले आहे.

204 कृत्रिम तलाव

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने तब्बल 204 कृत्रिम तलाव (artificial ponds) तयार केले आहेत.

कृत्रिम तलावांची माहितीही भाविक आणि गणेशभक्तांना क्यूआर कोडद्वारे मिळणार आहे. हा 'क्यूआर कोड' स्कॅन केल्यानंतर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅपची लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. तसेच कृत्रिम तलावांची माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGanpatiDeQR या लिंकवरून मिळवता येईल.

विसर्जनाच्या वेळी घ्यावयाची काळजी-

1. खोल समुद्राच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका.

2. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घेण्यात यावी.

3. गर्दीच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे दर्शन टाळावे.

4. पोहण्यास मनाई असलेल्या भागात जाण्याचा प्रयत्न करू नका.

5. समुद्रात किंवा तलावात कोणी बुडताना दिसल्यास तात्काळ अग्निशमन दल, पोलीस किंवा जीवरक्षकांना कळवा.

6. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

7. भक्तांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नका.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती-ओहोटी

यावर्षी, अनंत चतुर्दशीला 17 सप्टेंबर 2024 रोजी समुद्राला सकाळी 11:14 वाजता 4.54 मीटरची मोठी भरती असणार आहे. तसेच 5:22 वाजता 4:39 मीटरची मोठी भरती असेल.

18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:27 वाजता कमी उंचीची भरती 0.48 मीटर असेल. तसेच सकाळी 11:37 वाजता 4.71 मीटरची मोठी भरती असणार आहे. या भरतीच्या वेळी तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळी विसर्जनासाठी चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांना पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

प्रथमोपचाराची सोय

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंगरे' या प्रजातींचे प्रमाण अधिक असते. जेलिफिशचा डंश झाल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच '108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका' तैनात करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

2025 पासून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य : महाराष्ट्र सरकार

खुशखबर! मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल

पुढील बातमी
इतर बातम्या