जन्म-मृत्यू, विवाह प्रमाणपत्र आता 3 दिवसांत मिळणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक वेगवान करण्यात आली आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणी झाल्यानंतर तीन कामकाजाच्या दिवसांत प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांवर जन्म आणि मृत्यू नोंदणी तसेच प्रमाणपत्रातील दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.

जन्म प्रमाणपत्रात मुलाचे नावही करता येणार

नव्या सुविधेमुळे जन्म प्रमाणपत्रावर मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठीही अर्ज करता येणार आहे. याशिवाय जन्म प्रमाणपत्रातील विविध तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालकांचे नाव, कायमस्वरूपी किंवा तात्पुरता पत्ता, जन्मतारीख, लिंग आणि इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिक अर्ज करू शकतात.

कोणत्या प्रमाणपत्रासाठी किती वेळ?

विवाह प्रमाणपत्रातील दुरुस्ती – 3 कामकाजाचे दिवस

नवीन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र – नोंदणीनंतर 3 कामकाजाचे दिवस

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्ती – 25 कामकाजाचे दिवसांपर्यंत

दुरुस्तीच्या स्वरूपानुसार जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी लागणारा कालावधी बदलू शकतो.

जुन्या प्रमाणपत्रांना मिळणार QR कोड

जुने जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र आता QR कोड असलेल्या नव्या प्रमाणपत्रात रूपांतरित करता येणार आहेत. यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर स्वतंत्र काऊंटर सुरू करण्यात आला आहे.

Unique IDने अर्जाचा स्टेटस तपासा

नागरिकांना अर्ज केल्यानंतर त्याची स्थितीही तपासता येणार आहे. नागरी सुविधा केंद्रातून मिळणाऱ्या पोचपावतीवर Unique ID दिला जाईल. या क्रमांकाच्या मदतीने अर्जाचा स्टेटस ट्रॅक करता येणार आहे.

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील काही दुरुस्त्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

नागरिकांना प्रक्रिया समजणे सोपे जावे यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर अर्ज करण्याची पद्धत आणि आवश्यक माहिती देणारे फलकही लावण्यात येत आहेत.

अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी अधिकाऱ्यांना या सुविधांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या आणि अर्ज प्रक्रियेची पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या नव्या व्यवस्थेमुळे जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा त्यातील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयांच्या फेऱ्या कमी कराव्या लागणार असून, प्रमाणपत्र मिळण्याचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.


हेही वाचा

ग्रामीण भागातील 19 अनधिकृत जीन्स वॉशिंग युनिट्सवर MPCBची कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या