दादर बस अपघात : RTO च्या अहवालात चालक जबाबदार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील दादर प्लाझा परिसरात वीर कोतवाल गार्डनजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर बसचालकाने ब्रेक निकामी झाल्याचा दावा केला होता. मात्र, ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) प्राथमिक तपास अहवालानुसार बसची ब्रेक यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होती.

या अपघातात बेस्टची ओलेक्ट्रा कंपनी निर्मित इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर गेल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले होते. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता घडली होती.

RTO अधिकाऱ्यांनी बसची तपासणी केल्यानंतर ब्रेक, गिअरबॉक्स किंवा हँडब्रेकमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नसल्याचे नमूद केले आहे. अपघातामुळे बसमधील अंतर्गत वायरिंग तुटल्याने इलेक्ट्रिक बसची प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे बस स्थिर अवस्थेत ठेवूनच यांत्रिक तपासणी करण्यात आली.

प्राथमिक अहवालानुसार, हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चालक घाबरल्याने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबला गेला असावा, असा अंदाज RTO अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या शिफारशीनंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त बस सध्या बेस्ट प्रशासनाच्या ताब्यात असून घटनेच्या सखोल चौकशीसाठी बेस्टने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.


हेही वाचा

एअरटेल आणि व्हीआयमार्फत ॲक्वा लाईनवर मोबाईल नेटवर्कचा विस्तार

पुढील बातमी
इतर बातम्या