मुंबईतील दादर कबूतरखाना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून बंद असलेला दादर कबूतरखाना अजूनही ताडपत्रीने झाकलेला असल्याने परिसर विद्रूप दिसत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महेश सावंत यांनी येथे रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दादरमधील प्रसिद्ध कबूतरखान्यावर कारवाई करण्यात आली. संरचनेवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले, कबुतरांसाठी ठेवलेले खाद्य काढण्यात आले आणि संपूर्ण परिसर ताडपत्रीने झाकून बंद करण्यात आला.
या कारवाईविरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अनेक महिने या प्रकरणावर सुनावणी सुरू राहिली. दरम्यान, कबूतरखाना कायम ताडपत्रीखालीच राहिला. सुरुवातीला या कारवाईमुळे जैन समाजामध्ये नाराजी होती, मात्र आता हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महेश सावंत यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सार्वजनिक आरोग्याचा विचार करून कबूतरखाना बंद करण्यात आला. मात्र, ताडपत्रीने झाकलेली ही रचना आता परिसराचे सौंदर्य बिघडवत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करत आहे. त्यामुळे येथे योग्य ती कारवाई करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दादर पश्चिमेतील हा प्रसिद्ध कबूतरखाना मुंबईच्या ओळखीचा एक भाग मानला जातो. इतकेच नव्हे तर संपूर्ण परिसरालाच “दादर कबूतरखाना” म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या संरचनेबाबत गेल्या काही वर्षांत हटवण्याच्या मागण्या वाढल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीही हा मुद्दा गाजला होता, मात्र त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेच्या जी-नॉर्थ विभागाने कारवाई केली होती.
हेही वाचा